समाजवादी पार्टी सुद्धा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 लढणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात अखिलेश यादव यांची एन्ट्री?
मुंबई :-
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून तयारी सुरु आहे. आता महाविकास आघाडीची तयारी सुरु असून समाजवादी पक्षाने देखील जागांवर दावा केला आहे. यासाठी अखिलेश यादव महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.
मुंबई – प्रफुल्ल शेवाळे
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केल्यानंतर तयारीला जोर आला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीची तयारी जोरदार सुरु आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये छोटे पक्ष नाराज असल्याचे समोर आले आहे. इंडिया आघाडीमध्ये एकत्रित असलेल्या समाजवादी पक्षाला डावले जात असल्याचे समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता जोरदार चर्चा रंगल्या असून समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.
लोकसभा निवडणूकीमध्ये इंडिया आघाडी म्हणून कॉंग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि समाजवादी पार्टी हे इतर पक्षांसोबत एकत्रितपणे लढले होते. यानंतर आता राज्यातील निवडणूकांमध्ये देखील एकत्रित लढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आली असून अजूनही समाजवादी पार्टीसोबत कोणतीही बोलणी झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष नाराज असल्याचे उघड झाले आहे. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे नेते अबु आझमी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त देखील केली होती.
यावर बोलताना अबु आझमी म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये उदधव ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉंग्रेस यांचीच बैठक होते. विधानसभेच्या आधी कॉंग्रेसकडून जागा देखील जाहीर करण्यात येणार होत्या. त्या जागा जाहीर होण्यापूर्वी एकदा आमच्या पक्षाची चर्चा झाली पाहिजे. बैठक घेऊन आम्हाला किती जागा देणार किंवा देणार नाही, याची माहिती दिली पाहिजे. इंडिया आघाडीमध्ये आम्ही लोकसभेमध्ये एकत्रितपणे उत्तम लढत दिली. तशीच लढत विधानसभेमध्ये देण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला 12 जागा हव्या असून त्यांवर आम्ही निवडणून येणार असा आमचा दावा आहे. या संबंधित चर्चा करण्यासाठी आता समजावादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. समाजवादी पक्ष हा देशातील तिसऱ्या नंबरचा पक्ष असून त्यांचे म्हणणे मविआच्या नेत्यांना ऐकावे लागेल, असे मत अबु आझमी यांनी व्यक्त केले.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची घोषणा केली आहे. जागावाटपच्या अंतिम टप्प्यामध्ये बोलणी आलेली असताना अखिलेश यादव हे महाराष्ट्रामध्ये येत आहे. अखिलेश म्हणाले की, उद्या महाराष्ट्रच्या दौऱ्यावर जाणार आहे. जागावाटपात आपल्या पक्षाला अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करेल. इंडिया आघाडीतून निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही काही जागांबाबत बोललो आहोत. आमचे दोन आमदार होते. आता आणखी जास्त जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे, अशा भावना अखिलेश यादव यांनी व्यक्त केल्या आहेत.