नवी मुंबई मध्ये संदीप नाईक ‘तुतारी’ हाती घेणार का? भाजप ला धक्का?

संदीप नाईक ‘तुतारी’ हाती घेणार का? भाजप ला धक्का?

मुंबई :

भाजप शिस्त पाळणारा पक्ष आहे. निर्णय घेईपर्यंत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. संदीप नाईकांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांनी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. – गणेश नाईक, आमदार

नवी मुंबई तील विधानसभा निवडणुकीत ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघ नाईक कुटुंबाला मिळावेत, असा आग्रह भाजपचे आमदार गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी धरला होता. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत बेलापूरमधून आमदार मंदा म्हात्रे यांना तर ऐरोलीतून गणेश नाईक यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे संदीप नाईक यांना डावलल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाराज संदीप नाईक ”कमळ’ बाजूला करत हातात ‘तुतारी’ घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
मंगळवारी (२२ ऑक्टोबर) संदीप नाईक हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. बेलापूर मतदारसंघात तशा हालचालीदेखील सुरू झाल्या असून मंगळवारी वाशीत कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर ते निर्णयावर मोहोर उमटवणार आहेत. संदीप नाईक यांच्या या भूमिकेमुळे भाजपला जोरदार धक्का बसला आहे.

अनेक दिवसांपासून संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघात माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांशी संवाद साधत विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यांनी बेलापूरला जनसंपर्क कार्यालयदेखील सुरू केले होते. नाईक परिवाराला दोन्ही तिकीटे मिळतील, असा प्रचार समाज माध्यमांवर जोरदार सुरू होता. मात्र भाजपने ऐरोली विधानसभेतून गणेश नाईक यांना पुन्हा उमेदवारी देताना संदीप नाईक यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे शरद पवार गटात जावून नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा लढवाव्यात, अशी आजही भूमिका नाईक समर्थकांची आहे. तसेच पक्षाने तिकीट दिले नाही तर वेगळी चूल मांडण्याचा इशारा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!