राज्यात विधानसभा निवडणूक आचार संहिता लागण्यापूर्वीच महायुतीच्या सात आमदारांचा शपथविधी…
मुंबई : प्रफुल्ल शेवाळे
मुंबई : राज्यामध्ये अवघ्या काही तासांमध्ये आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वी राज्य सरकारने शिफारस केलेल्या सात नेत्यांनी राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शपथ घेतली आहे. यामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ तसेच पंकज भुजबळ यांना संधी देण्यात आली आहे.
राज्यामध्ये अवघ्या काही तासांमध्ये निवडणूका जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाकडून दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार असून यामध्ये निवडणूक जाहीर केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेनंतर लगेचच आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांकडून निर्णयाची सरबत्ती सुरु आहे. दुपारी आचारसंहिता लागणार असून त्यापूर्वी सात नेते आमदारकीची शपथ घेणार आहेत. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 7 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
महायुती सरकारकडून काल रात्री राज्यपाल नियुक्त आमदार ठरवण्यासाठी पाऊले उचलण्यात आली. सात या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली होती. सोमवारी रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे. आज या आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. यामध्ये दोन महिला नेत्या असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पदरामध्ये आमदारकी पडली आहे. त्याचबरोबर छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना देखील विधानपरिषदेचे आमदार म्हणून नियुक्त करण्यात येणार आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सातमध्ये भाजपला तीन शिवसेनेला 2 आणि अजित पवार यांना 2 अशा जागा देण्यात आल्या आहेत.
भाजप नेत्या आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना आमदारकीची संधी देण्यात आली आहे. राजकीय वर्तुळामुळे नेहमी चर्चेमध्ये असणाऱ्या चित्रा वाघ यांना संधी देत नसल्याची नाराजी त्यांच्या समर्थकांमध्ये होती. त्यानंतर आता चित्रा वाघ यांना महायुती सरकारकडून विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. या संधीनंतर भावना व्यक्त करताना चित्रा वाघ म्हणाल्या आहेत की, मला पक्षाचे धन्यवाद मानायचे आहेत. कार्यकर्त्यांचे गुण पारखणारा हा पक्ष आहे. आणि याची पावती मला मिळाली. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखवलेला विश्वास त्यामुळे मी उभी आहे, असे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे.
त्याचबरोबर अजित पवार यांच्या पक्षाकडून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी यापूर्वी नांदगाव विधानसभा मतदारसंघामधून दोन वेळा त्यांनी विधानसभेमध्ये जागा मिळवली होती. त्यानंतर आता पंकज भुजबळ हे विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त आमदार होणार आहेत.
त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून देखील वक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांचे राजकीय पुर्नवसन केले आहे. मनीषा कायंदे या पूर्वी भाजप पक्षामध्ये होत्या. त्यानंतर त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी भावना व्यक्त करताना मनीषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला. आणि योग्य तो सन्मान केला, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर शिंदे गटाकडून माजी खासदार हेमंत पाटील यांना देखील विधान परिषदेची उमेदवारी देत राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.
अजित पवार यांनी इद्रिस नाईकवडी यांना देखील संधी दिली आहे. ते सांगलीचे महापौर राहिलेले आहेत. 25 वर्षांपूर्वी दिलेला शब्द शरद पवार यांनी पाळला नाही. मात्र अजित पवार यांनी पाळला. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली, असे इद्रिस नाईकवडी म्हणाले आहेत. भाजपकडून पनवेलचे माजी उपमहापौर आणि भाजपचे विद्यामान प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खास मर्जीतील असल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर भाजपने बंजारा समाजातील नेतृत्वाला संधी दिली आहे. विदर्भातील पोहरादेवीच्या गुरुगादीचे पीठाधीश धर्मगुरु बाबूसिंग महाराज राठोड यांना आमदारकी दिली आहे.