मुंबई लोकल च्या गर्दीने डोंबिवली येथील विद्यार्थी जीवाला मुकला…
डोंबिवली-कोपरदरम्यान ITI च्या विद्यार्थ्याचा ट्रेनमधून पडून मृत्यू
ठाणे : प्रफुल्ल शेवाळे
रेल्वे प्रशासनाने लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवरील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्टेशनवर फास्ट लोकल ट्रेन थांबवण्याचा निर्णय घेतलाय. तरीही मध्य रेल्वेवरील गर्दी कमी झालेली दिसत नाहीये. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानंतर प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. अशाच प्रवाशांनी भरलेल्या लोकल ट्रेनमधून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
20 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकादरम्यान एकाचा पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोकलमधील गर्दीमुळे विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झालाय. आयुष दोषी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आयुष हा आयटीआयचा विद्यार्थी होता. आयुषच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा पुढील तपास डोंबिवली जीआरपी पोलिसांनी सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं?
20 वर्षीय आयुष हा आपल्या कुटुंबासह डोंबिवली पश्चिम सम्राट चौक येथे राहत होता. मुलुंड येथे आयुष हा आयटीआय शिकत होता. आज आयुषने नेहमीप्रमाणे सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने जाणारी 8 वाजून 15 मिनिटांची फास्ट लोकल पकडली.
लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. गर्दीमुळे लोकलमध्ये आत शिरण्यास जागाच मिळाली नसल्याने तो दरवाजावर उभा होता. मात्र याचदरम्यान त्याचा तोल गेल्याने लोकलमधून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.
रेल्वे प्रशासनाने वाढते अपघात लक्षात घेता कळवा आणि मुंब्रा दरम्यान काही लोकल ट्रेनला थांबा देण्याचा निर्णय घेतला. रेल्वे प्रशासनाने 5 ऑक्टोबरपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानंतरही लोकल गर्दीतून पडून प्रवाशांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे.
लोकलबळींची संख्या सातत्याने वाढणारीच…
दरम्यान मागील दहा महिन्याच्या कालावधीत रेल्वेप्रवासात जवळपास दीड हजार प्रवाशांनी जीव गमावला आहे. दिवसागणिक रेल्वेची गर्दी वाढत असून ही गर्दी निष्पाप प्रवाशांच्या जीवावर उठत आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासन केव्हा उपाययोजना करणार, असा संतप्त प्रश्न दररोज जिवावर उदार होत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी
केला आहे.