अरं बाबांनो,मला जी शिवीगाळ करायची आहे ती करा पण…’, विरोधकांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानपिचक्या….

अरं बाबांनो,मला जी शिवीगाळ करायची आहे ती करा पण…’, विरोधकांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानपिचक्या….

मुंबई : प्रफुल्ल शेवाळे

विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. तुम्ही बांधलेल्या राखीची शपथ घेऊन सांगतो की, तुमचा दादा लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे.

महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण ही योजना सध्या चर्चांच्या केंद्रस्थानी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरेल असा विश्वासही महायुतीच्या नेत्यांना आहे. त्यातच आता अजित पवार यांनी आपल्या लाडक्या बहि‍णींसाठी एक खास संदेश दिला आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे यंदाचं रक्षाबंधन कधीही विसरू शकणार नाही म्हणत अजितदादांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच पुढे त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.

राखीपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यातील हजारो बहि‍णींनी मला राख्या बांधल्या, त्यामुळे मी जगातला सर्वात भाग्यशाली दादा झालो, त्यामुळेच माझी जबाबदारी आता लाख पटीने वाढली असं अजित पवार म्हणाले. तसंच मी तुमच्यासाठी नेहमी तत्पर राहील, तसुभरही मागे हटणार नाही, हा माझा वादा आहे असं अजित पवार म्हणाले.

लाडकी बहीण योजना आम्ही आणली तेव्हा विरोधक म्हणत होते की या योजनेची अंमलबजावणी शक्यच नाही. नंतर जेव्हा फॉर्म भरायला सुरूवात झाली तेव्हा विरोधक म्हणाले की फक्त फॉर्म भरून घेणार पण खात्यात पैसे जमा होणार नाही, आणि त्यानंतर जेव्हा आम्ही पैसे पाठवायला सुरू केली तेव्हा विरोधक म्हणाले की निवडणुकीनंतर पैसे येणार नाही असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आल्यास आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू असं अजित पवार यावेळी म्हणाले. तुम्ही बांधलेल्या राखीची शपथ घेऊन सांगतो की, तुमचा दादा लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द अजित पवार यांनी दिला. विरोधक म्हणतात की, महिलांना थेट पैसे देणं व्यर्थ आहे. मात्र मला मागच्या दोन महिन्यात अनेक बहिणी भेटल्या, अनेक बहि‍णींनी पत्र पाठवलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही या पैशात लहानमोठे व्यवसाय सुरू केले. तर काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी या पैशांचा उपयोग केला.

राज्यातील करोडो महिलांच्या स्वप्नांसाठी लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरतेय असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना एक आव्हानही केलंय. अजित पवार म्हणाले की, विरोधकांनी मला किती शिवीगाळ करायची ती करा, मात्र लाडकी बहीण योजनेबद्दल चुकीची माहिती पसरवून माझ्या माय-माऊलींच्या स्वप्नांवर पाणी फिरवू नका असा हल्लाबोलही अजित पवार यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!