महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हेलिकॉप्टर प्रवास आणि मुख्यमंत्री सुखरूप वाचले…
सातारा : वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टरचं तातडीने लँडिंग करावं लागलं. त्यावेळी नेमकं काय घडलं याची माहिती त्यांच्या ओएसडींनी दिली आहे.
खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरलं
हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान नेमकं काय घडलं?
महाबळेश्वर: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेक ऑफ घेतलेलं हेलिकॉप्टर हे काही मिनिटात पुन्हा त्यांच्या दरे या गावी लँड करावं लागलं. अचानक हवामान खराब झाल्यामुळे हेलिकॉप्टर माघारी फिरविण्यात आलं. पण त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये नेमकं काय घडलं याबाबत आता सविस्तर माहिती समोर आली आहे.
वातावरण खराब झाल्याने हेलिकॉप्टर हे अचानक खाली येऊ लागलं. ज्यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता अधिक होती. पण वेळीच माघारी फिरून लँडिंग केल्याने हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरुप वाचले. अशी माहिती मुख्यमंत्र्याचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी दिली आहे.
‘संपूर्ण प्रसंगादरम्यान वाचताना केलेल्या पुण्यकर्माची आठवण झाली’
‘महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब हे त्यांचे मूळ गाव असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावातून हेलिकॉप्टरने पुण्याच्या दिशेने स्वीय सहाय्यक प्रभाकरजी काळे, मंगेश चिवटे आणि विशेष कार्य अधिकारी कवळे यांच्यासोबत मार्गस्थ झाले होते. परंतु अचानक ढगाळ वातावरण झाले अन् मुसळधार पाऊस सुरु झाला.’
‘कोयना बॅकवॉटरच्या अगदी पंधरा फूट वर हेलिकॉप्टर खाली आले होते. आजूबाजूच्या कोणत्याही एका शेतामध्ये हेलिकॉप्टर लँड करावे का? याबाबत पायलट आमच्याजवळ विचारणा करत होते. परंतु त्या सोयीची कोणतीही जमीन आजूबाजूला नसल्याने आमचे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा माघारी दरे या गावाच्या दिशेने निघाले.’
‘जेथून आम्ही टेकऑफ घेतला होता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड झाले आणि साहेब पुन्हा एकदा मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले.’
‘अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना अधिक प्रमाणात असताना महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्वजण सुखरुप आहोत. या संपूर्ण प्रसंगादरम्यान वाचताना केलेल्या पुण्यकर्माची आठवण झाली. आता आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो आहोत.
मुख्यमंत्र्यांना कारने करावा लागला प्रवास…
महाबळेश्वर तालुक्यात सध्या परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असून खराब हवामानामुळे ढगांचा गडगडाट आणि पावसामुळे वातावरण ढगाळ आहे. अशा प्रकारचं वातावरण हे हेलिकॉप्टरच्या प्रवासासाठी योग्य नसल्याने मुख्यमंत्र्यांना माघारी फिरावं लागलं. त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी कारने आपला प्रवास सुरू केला आहे.
कोयना जलाशयाच्यामार्गे बामनोली ते थेट पुणे सातारा महामार्गावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
दरे गावी का आले होते मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
निवडणुकीपूर्वी त्यांच्या मुळगाव दरे गावात ग्रामदैवत जननी माता मंदिरात दर्शनासाठी आले होते. विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर अर्ज भरण्याची तारीख 29 ऑक्टोबर आहे. त्याआधीच महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र असलेले एकनाथ शिंदे हे मूळगाव दरे येथे जननी माता देवीच्या दर्शनासाठी दुपारी तीन वाजता दाखल झाले होते. देवीचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुंबईला रवाना होणार होते पण खराब वातावरणामुळे त्यांना आपला हेलिकॉप्टर प्रवास रद्द करावा लागला.