हुशश…मविआमधील तिढा अखेर सुटला! ‘या’ तारखेला होणार जागावाटपाची घोषणा,
दिल्लीतील काँग्रेस बैठकीनंतर चेन्निथला यांची माहिती…
वृत्तसेवा – नवी दिल्ली
आज दिल्लीत काँग्रेस निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कधी जाहीर होणार याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Elections 2024) महायुतीचे जागावाटप जवळपास फायनल झाले असताना महाविकास आघाडीचे घोडे काही जागांसाठी अडले आहे. महाविकास आघाडीमध्ये विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून तीव्र मतभेद सुरू असल्याचे समोर येत आहे. काही जागांवरून काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामुळे महाआघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. यावर आता काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मध्यस्थी करत चर्चेती गाडी पुन्हा रुळावर आणली आहे. आज दिल्लीत काँग्रेस निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कधी जाहीर होणार याची माहिती दिली आहे.
काँग्रेस निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह राज्यातील अन्य नेते उपस्थित होते.
काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीनंतर रमेश चेन्निथला यांनी सांगितले की, मंगळवारी (२२ ऑक्टोबर) रोजी दुपारी तीन वाजता मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. यात सविस्तर चर्चा होऊन २५ तारखेपर्यंत सर्व जागांचा अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच २५ ऑक्टोबर रोजी जागावाटपाची घोषणा केली जाईल.
आजच्या बैठकीबाबत रमेश चेन्निथला म्हणाले, निवडणूक समितीच्या बैठकीत ६३ जागांबद्दल चर्चा केली. अंतिम यादी माध्यमांना दिली जाईल. २२ ऑक्टोबर रोजी मुंबईत आमच्या मित्रपक्षांसोबत चर्चा करून अंतिम यादी जाहीर केली जाईल.
महाविकास आघाडीत काही जागांवरून तिढा होता…
शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षात काही जागांवरून रस्सीखेच आहे. अनेक मतदारसंघांवर तिन्हीपैकी दोन पक्षांनी दावे केले. त्यातील अनेक मतदारसंघातील तिढा सुटला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ७-८ जागांवरच तिढा आहे. जो सहमतीने सोडवला जाईल.
या जागांसंदर्भात मंगळवारी महाविकास आघाडीच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत असून, त्यामुळे त्याच दिवशी वादग्रस्त जागांवर अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न महाआघाडीतील नेते करू शकतात.