राहुल गांधी आणि प्रणिती शिंदें यांच्या लग्नाच्या निव्वळ अफवा आहेत…
-सुशीलकुमार शिंदे यांचे स्पष्टीकरण
मुंबई :- प्रफुल्ल शेवाळे
2024 मध्ये प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमधून खासदारकीची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांचा पराभव केला होता
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर चर्चांना ऊत आला होता. त्यामुळे या नात्याबाबत राज्यभरात वेगवेगळे तर्कवितर्क काढले जाऊ लागले. आता याबाबत प्रणिती शिंदे यांचे वडील आणि माजी मुख्यमंबी सुशीलकुमार शिंदे यांनीच यावर भाष्य केलं आहे. राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या विवाहाच्या चर्चा केवळ अफवा आहेत. असे स्पष्टीकरण सुशीलकुमार शिंदे यांनी दिले आहे.
शुभंकर मिश्रा यांच्या एका शोदरम्यान सुशील कुमार शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, माझी मुलगी प्रणिती खासदार आहे. खासदार म्हणून राहुल गांधींशी हस्तांदोलन केलं म्हणून काय झालं? अशा प्रकारे लग्नाच्या अफवा पसरवणे चुकीचे आहे. त्यांच्या लग्नाबद्दल कोणतीही चर्चा नाही. दरम्यान, सुशील कुमार शिंदे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली असून त्यांनी त्यांचा राजकीय वारसा त्यांनी कन्या प्रणिती यांच्याकडे सोपवला आहे.
9 डिसेंबर 1980 रोजी प्रणिती शिंदे यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. याशिवाय त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून एलएलबी केले आहे. 2009 मध्ये प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक जिंकली. यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुका जिंकून हॅट्ट्रिक केली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान प्रणिती शिंदे यांच्याकडे अमरावती परिमंडळाची जबाबदारीही देण्यात आली होती. केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रीनिंग कमिटीचाही त्या भाग होत्या.
2024 मध्ये प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमधून खासदारकीची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांचा पराभव केला. सोलापूरमधून निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला खासदार आहेत.काही दिवसांपूर्वी प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर चर्चेत होती. प्रणिती यांचा राहुल गांधींसोबतचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांनाही उधाण आले होते. त्यावर सुशील कुमार शिंदे यांनी लग्नाचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.