मुंबई महानगर पालिकेचा धरण प्रकल्प ग्रसतांच्या बाबत मोठा निर्णय
धरण प्रकल्पग्रस्तांच्या खापर पणतू आणि पणतीलाही मिळणार नोकरी;
मुंबई : प्रफुल्ल शेवाळे
मुंबई :-यापुढे धरण प्रकल्पग्रस्तांच्या खापर पणतू आणि पणतीलाही मिळणार नोकरी; मुंबई पालिकेचा निर्णय समोर आला आहे.
भातसा धरण प्रकल्पात बाधित झालेल्या 28 प्रकल्प बाधितांना मुंबई महापालिकेकडून रोजगार देण्यासाठी मुंबई महापालिका सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वात सुधारण करण्यात आली आहे. त्यानुसार आता प्रकल्प बाधित व्यक्तीचा खापर पणतू, त्याची पत्नी किंवा खापर पणती यांनीही महापालिका सेवेत नोकरी मिळणार आहे. राज्य शासनाच्या महसूल आणि वन खात्याद्वारे प्रकल्प बाधित व्यक्तींना भरपाई अथवा नोकरी सेवा लाभ देण्याबाबत राबविण्यात येत असलेल्या सुधारित धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वांची यापुढे मुंबई महापालिका स्तरावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
यापूर्वी, पाणी प्रकल्पाच्या अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या धरण प्रकल्पात बाधित होणाऱ्या व्यक्तींना, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियातील त्याची पत्नी, मुले, भाऊ, बहीण, सून, नातू, नात, दत्तक मुलगा किंवा दत्तक मुलगी यांना नुकसान भरपाई अथवा पालिका सेवेत नोकरी देण्याबाबत धोरण राबविण्यात येत होते. मात्र आता राज्य शासनाच्या धर्तीवर सदर धोरण आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यात कधी महत्त्वाची सुधारण करण्यात आली आहे. त्यावर आता मुंबई महापालिका त्याची अंमलबजावणी करणार आहे. त्यानुसारच, यापुढे धरण प्रकल्पाच्या अंतर्गत बाधित व्यक्तीला अथवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील अंतिम वारसदार म्हणून आता प्रकल्प बाधित व्यक्तीचा खापर पणतू, त्याची पत्नी किंवा खापर पणती यांनीही महापालिका सेवेत नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईला उपनगरातील तुळशी आणि विहार या दोन छोट्या तलवांच्या व्यतिरिक्त ठाणे जिल्हा परिसरातील अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, मध्य वैतरणा या प्रमुख पाच धरण प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात म्हणजे दररोज 3,950 दशलक्ष लिटर इतक्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दररोज करण्यात येतो. ब्रिटिश काळापासून जुन्या तलावांच्या माध्यमातून मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येतो आहे.
वास्तविक, भातसा धरण प्रकल्प हा राज्य शासनाने 1967 या वर्षी भातसा योजनेच्या नावाखाली मुंबई शहराला नवीन पाणी पुरवठा स्त्रोत म्हणून हस्तांतरीत केला. या योजनेच्या अंतर्गत पहिला टप्पा 1979 मध्ये (455 दशलक्ष लिटर), दुसरा टप्पा 1986 मध्ये (455 दशलक्ष लिटर) आणि तिसरा टप्पा 1996 रोजी (455 दशलक्ष लिटर) असं तीन टप्प्यात पूर्णत्वास नेण्यात आला होता. त्यावेळी भातसा धरण प्रकल्प उभारण्यासाठी 269 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. मात्र या खर्चात मुंबई महापालिकेने 207 कोटींचा (77 टक्के) खर्चाचा भार उचलला होता.
मुंबईला सध्या दररोज 3,950 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो. मुंबईला पावसाळा संपल्यावर पुढील वर्षभरासाठी पाणी कपात शिवाय सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी सात तलावात मिळून एकूण 14,47,363 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असणे आवश्यक असते. त्यापैकी तब्बल 50 टक्के अथवा त्यापेक्षाही जास्त पाणी पुरवठा एकट्या भातसा धरणामधून करण्यात येतो, हे या भातसा धरणाचे मोठे वैशिष्ट्य आहे.