मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मुंबई मतदारसंघात हेरिटेज विद्युत खांब बसविणार; दोन कोटींचा खर्च
मुंबई :- प्रफुल्ल शेवाळे
विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीच स्थानिक आमदार आणि उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी, त्यांच्या मतदार संघातील चर्नी रोड ते ऑपेरा हाऊसपर्यंत रस्ते, पदपथ या ठिकाणी हेरिटेज पद्धतीचे विद्युत खांब बसविण्याच्या कामाला महापालिका आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी प्राप्त करून घेतली आहे.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीच स्थानिक आमदार आणि उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी, त्यांच्या मतदार संघातील चर्नी रोड ते ऑपेरा हाऊसपर्यंत रस्ते, पदपथ या ठिकाणी हेरिटेज पद्धतीचे विद्युत खांब बसविण्याच्या कामाला महापालिका आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी प्राप्त करून घेतली आहे. त्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
सध्या आचारसंहिता लागू झालेली असली तरी तत्पूर्वीच प्रस्ताव मंजूर करून घेतल्याने सदर कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. कामाचे कार्यादेश मिळाल्यापासून पुढील 120 दिवसांत सदर काम पूर्ण करावयाचे आहे. तसेच, काम पूर्ण झाल्यावर त्याचे फोटो काढून पुरावा म्हणून सादर करणे कंत्राटदार बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे त्याला पुढील एक वर्ष हेरिटेज विद्युत खांबाची देखभाल आणि दुरुस्तीची कामे पहावी लागणार आहे.
मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबईत शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी सुशोभिकरणाची दोन हजार कोटी रुपयांची कामे यापूर्वीच हाती घेण्यात आली आहेत. मात्र काही ठिकाणी कामे युद्धपातळीवर सुरू असून काही ठिकाणी कामे प्रगतीपथावर आहेत तर काही कामे रेंगाळलेली आहेत. सदर कामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शहर जिल्हा दीपक केसरकर, पालकमंत्री उपनगरे मंगल प्रभात लोढा, महापालिका आयुक्त भूषण गगराणी चार अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून निवडणूक आचारसंहिता लागू होईपर्यंत सतत पाठपुरावा सुरू होता. मुंबईत महापालिका मुख्यालय परिसर, घाटकोपर, अंधेरी आदी परिसरात रस्ते, पदपथ, वाहतूक बेटे आदी ठिकाणी महापालिकेने सुशोभिकरण कामाच्या अंतर्गत हेरिटेज विद्युत खांब बसव आहेत.
दरम्यान, महापालिकेने चर्नी रोड ते ऑपेरा हाऊसपर्यंत रस्ते, पदपथ या ठिकाणी हेरिटेज पद्धतीचे विद्युत खांब बसविण्यासाठी टेंडर काढले होते. त्यामध्ये, महापालिकेने सदर कामासाठी 1,76,81,694 रुपये इतका खर्च अंदाजित केला होता. टेंडर प्रक्रियेला चार कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी, एक कंत्राटदार मे. अस्मी इंटर प्राईजेस याने तांत्रिक छाननीत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे तो टेंडर प्रक्रियेत बाद ठरला, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
उर्वरित तीन कंत्राटदारांपैकी एक मे. पाटील इलेक्ट्रिकल याने अंदाजित खर्चापेक्षा शून्य टक्के कमी म्हणजे 1,76,81,694 रुपये + (अधिक 18 टक्के जीएसटी अंदाजे 30 लाख रुपये) खर्च दाखवला. तर मे.आर.जे इन्फोटेक या कंत्राटदाराने अंदाजित खर्चापेक्षा फक्त 2 टक्के कमी म्हणजे 1,73,28,060 रुपये + (अधिक 18 टक्के जीएसटी अंदाजे 30 लाख रुपये) एवढा खर्च दाखवला. मात्र मे. जैन इंजि. वर्क्स यांनी अंदाजित खर्चापेक्षा पाच टक्के कमी म्हणजे 1,67,97,609 रुपये + (अधिक 18 टक्के जीएसटी अंदाजे 30 लाख रुपये) एवढा खर्च दाखवला. त्यामुळे सदर कंत्राटदाराला सर्वात लघुत्तम दर ठरवत पात्र ठरवले. त्यामुळे आता हेरिटेज पद्धतीचे विद्युत खांब बसविण्याचे कंत्राट काम करण्यास मे. जैन पात्र ठरला आहे.