उद्याच्या मत मोजणीसाठी ठाणे जिल्हा निवडणूक प्रशासन यंत्रणा सज्ज, मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त…
ठाणे : प्रफुल्ल शेवाळे
ठाणे : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं.ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघामध्ये बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. मतदान यंत्रे स्ट्राँग रुममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उमेदवारांनीही मतमोजणीच्या ( Vote Counting ) कक्षात प्रत्येकी २२ पोलिंग एजन्ट नेमण्याची लगबग सुरू केली आहे.
ठाणे जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मिरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर या १८ मतदारसंघात दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले.
या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार असल्याने मतमोजणीसाठी प्रशासनाने निवडणूक निरीक्षक नेमले असून कामाची लगबग सुरू झाली आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाची मोजणी वागळे इस्टेट आय.टी.आय. येथे होणार आहे. तर ठाणे शहर विधानसभेची मतमोजणी न्यू होरिझन स्कूलमध्ये तर ओवळा-माजिवड्याची मतमोजणी आनंदनगर होरिझोन स्कूलमध्ये आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघाची मतमोजणी मुंब्रा येथील भारतरत्न अब्दुल कलाम स्टेडियम येथे होणार आहे.
मतमोजणी जलद होणार….
विधानसभा निवडणुकीसाठी यावर्षी मतमोजणीकरिता विशेष दक्षता घेण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनची मते मोजण्यासाठी जिल्ह्यात २८६ टेबलांची व्यवस्था केली आहे. पोस्टल बॅलेटची मते ८२ टेबल्स तर सैनिकांची मते मोजण्यासाठी २१ टेबल आहेत. त्यामुळे मतमोजणी जलद होणार आहे. असा विश्वास निवडणूक अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.